Friday, October 5, 2018

अगरबत्ती ...!!!


ती...!

मला भेटली फुटपाथवरच... भिक मागत...! वय वर्षे 70 च्या आसपास... दिसायला काळीसावळी आणि अंगावर अक्षरशः अर्धा इंचाची घाण...

तीन फुटांच्या अंतरावर गेलो तरी विचित्र, अतिशय घाणेरडा एक वास येतो...
अंगावर नाही म्हणायला एक मळकी साडी... (मळकी हा शब्द खुप थीटा आहे)

याला साडी का म्हणावं ? हाच मुळात प्रश्न आहे... अक्षरशः पाच साडेपाच फुटाचं हे   कापड ती अंगावर गुंडाळते... जे झाकायला जावं तेच उघडं पडतं... आणि दुर्दैव असं की तीला ते कळत नाही... जाणवत नाही... कारण डोळ्याच्या कसल्याशा प्राॕब्लेममुळे तीला काही दिसतच नाही...!

एकुण अवस्था अशी, की या आज्जीजवळ कुणी जावुच नये... तीच्याजवळ कुणी बसुच नये...!

तरीही मी जातो, बसतो.. तीच्याजवळ .. याचं कारण तीचं लाघवी बोलणं...

हिच्या गोब-या गालातुन एक एक शब्द असा बाहेर पडतो... जसा शंकराच्या पिंडीवर टांगलेल्या अभिषेकपात्रातुन थेंब थेंब अभिषेक व्हावा, त्या पिंडीवर  ...!

अतिशय शुद्ध आणि सात्त्विक !

भिक मागतांना  म्हणते... बाळा तुला जमलं काही तर मला दे, स्वतःला अडचणीत टाकुन मला काही देवु नकोस... आधी तु घे, प्रसन्न हो, त्यातुन काही उरलं आणि तुला जर मला द्यावंसं वाटलं तरच दे... अन्यथा नको !

गोळ्या मागतांना म्हणते, डाॕक्टरसाहेब, मला देणं शक्य असेल तरच गोळ्या द्या, अहो माझ्यापेक्षा जास्त त्रास असणारे खुप आहेत अजुन, त्यांना आधी द्या... मी काय करेन थोडं सहन... !

दुस-याचा विचार करण्याच्या तीच्या या वृत्तीमुळे मी हिच्याकडं आपसुकच ओढला गेलो होतो...

तीच्याजवळ बसलं की, तीचं बोलणं ऐकता ऐकता... बोलण्यातुनच  सुगंध इतका घमघमायला लागतो की अंगावरुन येणाऱ्या घाण वासाची जाणिवच होत नाही आपल्याला...

शेजारी बसलं की विचारते, मी एक श्लोक म्हणु... ? आणि आपल्या उत्तराची वाट न पाहता, ही "विश्वप्रार्थना" म्हणायला सुरुवात करते... सर्वांना चांगली बुद्धी दे... आरोग्य दे.....आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहु दे...!

या विश्वात ज्याच्याकडे सर्व काही आहे...तो स्वतःला अजुन काही तरी मिळुदे म्हणुन *"लाचार"* होतोय... आणि सर्वस्व गमावुन बसलेली ही आज्जी दुस-याला सुखात ठेव म्हणुन *"प्रार्थना"* करत्येय...!

स्वतःसाठी मागणं ही झाली लाचारी... आणि दुस-यासाठी मागणं ही झाली प्रार्थना ... दोन्हीतला फरक मला या आज्जीमुळेच समजला...!

ही आज्जी, एका मॕनेजर ची बायको... भरपुर श्रीमंती आणि खानदानी संस्कार, रास्तापेठेत यांचा जुना बंगला होता... सगळं काही होतं... पण घरात  कुणी चिमुकलं नव्हतं... दोन वेळा पोटातच बाळ गेलं...मरता मरता वाचली... तिसऱ्यावेळी डाॕक्टरांनी सांगितलं... आता तुम्हाला बाळ होणे नाही... दत्तक घ्या... मधल्या काळात यजमान गेले... इतके दिवस "दुर" असलेले सगळे नातेवाईक "जवळ" आले... आठवतील ती नाती सांगुन घराची वीट न् वीट घेवुन गेले...

सगळी "नाती" बरोबर येताना "पोती"  घेवुन आली होती...

या पोत्यांतुन सर्वस्व वाहुन नेलं हिचं...हिच्याच डोळ्यादेखत...

असलेली सगळी "नाती" हिंदकाळत "गोती" खात गेली...

आणि वाड्याची ही खानदानी मालकिण आता फुटपाथची राणी म्हणुन जगत्येय... गेली 15 वर्षे...

विश्वप्रार्थना गात... सर्वांना सुखी ठेव म्हणत...!

आपल्या अंगावरही धड कापड नसतांनाही... गात असते...सर्वांना ऐश्वर्यात ठेव...!

सगळ्यांनी लुबाडुन घेतलं तरी आर्त प्रार्थना करते.... सर्वांचं भलं कर...कल्याण कर....

ऐकणारा "तो" तीचं ऐकतोय की नाही माहित नाही... तरीही गोब-या गालांतुन हसत, वर बघत विश्वासानं म्हणत असते आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहु दे...!

मी एकदा चाचरत हिला म्हटलं, मावशी तु  मनानं इतकी सुंदर आहेस पण इतकी अस्वच्छ का राहतेस ?

ती म्हटली... अस्वच्छ ...? मी कुठंय अस्वच्छ ...???

अगं हा वास...? मी आवंढा गिळत...नजर चोरत बोललो....

ती म्हटली, हा वास घाणेरडा वाटतो का रे बाळा तुला ?
लहान आहेस तु बाळा अजुन....
अरे रस्त्यावर या घाणेरड्या वासानंच माझ्या रक्षण केलंय माझं... ! ती हसत बोलली...!!!

म्हणजे...?

कानाजवळ येवुन बोलली...

तुला माहीत आहे ? कापुर पेटवला की आजुबाजुला किडे येत नाहीत...मच्छरची अगरबत्ती पेटवली की मच्छर आसपास येवुन चावत नाहीत...

ही घाण नाही बाळा, हे माझं कापुर आहे... माझी अगरबत्ती आहे... या कापरामुळंच आणि अगरबत्ती मुळं समाजातले किडे आणि डास माझ्या वा-यालाही येत नाहीत...

बापरे... मी हा विचार ऐकुन हादरलो....

केवळ शील जपण्यासाठी जाणुन बुजुन ही घाणीत राहते...

आपण कुठल्या समाजात राहतो ? *स्वतःला जपण्यासाठी इथं स्वतःला आधी घाणीत लोळवावं लागतं... दुर्गंधाला आपलं कवचकुंडल बनवावं लागतं...*

या आज्जीनं नव-यामागं स्वतःला जपण्यासाठी अंगावर घाण चढवुन घेतली होती... मुद्दाम दुर्गंधीत झाली होती.... गंमत पहा कशी... *एका घाणीनं आणि दुर्गंधानं कुणाचं तरी पावित्र्य जपलं होतं..*  *काटे बोचतात, पण फुलाला जपतात तसं...*

मी मनोमन या माऊलीला नमस्कार केला... आता अंगावरची तीच्या एक इंचाची घाण म्हणजे तीनं अंगावर चोपडुन घेतलेलं पवित्र *भस्म* आहे असं मला वाटायला लागलं.... आणि तीच्यातुन येणारा दुर्गंध म्हणजे *सुगंधी कापराचा वास...!!!*

या आजीला मी डोळ्याच्या आॕपरेशन साठी घेवुन आलो 27 तारखेला...

अंगावर तीच अर्धीमुर्धी साडी... आणि तोच वास...!

दवाखान्यात बसलेल्या इतर सगळ्यांनीच हिला पाहुन नाक मुरडलं... नाकाला पदर लावले... कुणी कुणी चक्क उठुन निघुन गेले...

बरोबरच आहे, *चिखलात फुललेलं हे कमळ* आहे, याची कुणालाच जाण नव्हती...

इतरांसाठी हा *वास* होता... आणि माझ्यासाठी *सुगंध...*

संदर्भ कसे झटक्यात बदलतात ना ?

बाळाच्या शी शु चा "आईला" कधीच "वास" येत नाही... दुर्गंधीत असुनही....

जवळचं माणुस कुणी गेल्यावर, पार्थिवाशेजारी ठेवलेल्या अगरबत्तीचा वास ही नकोसा वाटतो मग... सुगंधीत असुनही....!

वास आणि सुगंध आपल्या मनाच्या कल्पना आहेत...

समोरच्याविषयी आपली भावना महत्वाची... चांगली भावना असेल तर *सुगंधच सुगंध* नाहीतर फक्त *घाणेरडा वास...!!!*

मी आज्जीच्या अर्ध्या घातलेल्या साडीकडं  पाहीलं ...

आणि मुक नजरेनं आमच्या भुवड ताईकडं पाहिलं...

भुवड ताईने त्याच मुक्या नजरेनं भुवड बाबांकडं पाहिलं... कुणीच कुणाशी काही बोललं नाही....

बाबा उठले आणि झटक्यात बाहेर गेले... बरोबर 20 मिनिटांनी परत आले... हातात दोन साड्या, एक गाउन, मोती साबण, अंग घासण्याची घासणी आणि टाॕवेल...!

मला हेच सांगायचं होतं भुवड ताईंना... न बोलताही त्यांना कळलं....मुक्या नजराही किती बोलक्या असतात ना काहीवेळा ...?

भुवड ताईंनी मग, या माऊलीला दवाखान्यातल्याच बाथरुम मध्ये नेलं... बाळाला चोळुन घालावी तशी पावणे दोन तास आंघोळ घातली...

भुवड ताई या वेळी मला एका लेकराची माय वाटली... कुठल्याही *वासाची* लागण न झालेली...! जे आहे ते सारं *सुगंधीच* आहे असं समजुन तो *सुगंध* अनुभवणारी....

आणि ती आज्जी झाली होती एक छोटं निरागस बाळ...

बाथरुम मधुन दोघी बाहेर आल्या तेव्हा सगळ्यात जास्त *सुगंध* आला माझ्या भुवड ताईच्या हाताचा.... जगातले सर्वात सुंदर हात होते ते... आणि तितकेच सुगंधी ....!

शुचिर्भुत झालेल्या आजीचं नवं रुप पाहुन मी स्तिमित झालो...

आजीचं 27 तारखेलाच डोळ्याचं आॕपरेशनही करुन घेतलं.... आता तीला दिसायला लागेल !

आॕपरेशननंतर,मी तीचे हात हातात घेवुन म्हटलं... आज्जी... तुझ्या अंगावरचं "भस्म" आणि "कापराचा वास"  आज आम्ही काढुन टाकलाय.... तुझी ही कवचकुंडलं काढुन घेतली आहेत... पण काळजी करु नकोस... तुला आजपासुन अशा कवचकुंडलांची गरज पडणार नाही....

म्हणजे ? आज्जी बोलली....

मी म्हटलं.... आता जीथं तुला  सन्मानानं सांभाळतील अशा ठिकाणी मी तुझी व्यवस्था करणार आहे...

इथुन पुढं तु गटारीत घाणीत फुटपाथवर राहणार नाहीस... मी ठेवेन तुला चांगल्या ठिकाणी ....!

पण तु हे का करतोयस माझ्यासाठी ? तीनं निरागस पणे विचारलं....

मी ही तितक्याच निरागसतेनं सांगीतलं... तु मला सांगीतलं होतंस ना ? तुझं बाळ दोनवेळा पोटातच गेलं....
अगं ते गेलं नव्हतंच कधी.... डाॕक्टरांनी  खोटंच सांगितलं होतं  तुला... मी तेच बाळ आहे तुझं....!!!
*फिरुनी पुन्हा जन्मलो मी....!!!*

तीचे डोळे डबडबले.... माझ्या गालावरुन हात फिरवत, ती प्रसन्न हसली... म्हणाली श्लोक म्हणु...?

नेहमीसारखीच उत्तराची अपेक्षा न ठेवता... तीनं डोळे मिटले...

माझे हात हाती घेतले... ते हात तसेच हातात ठेवुन तीने स्वतःचेही  हात जोडले...

... आणि विश्वप्रार्थना सुरु केली.... माझे हात हाती घेवुन....

सर्वांना चांगली बुद्धी दे...सर्वांचं भलं कर, सर्वांना आनंदात ऐश्वर्यात, सुखात ठेव, कल्याण कर, रक्षण कर... आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहु दे....!

मी तीच्याकडं एकटक पाहत होतो.... स्वतः जळत राहुन दुस-याला सुगंध देणारी ती एक *सुवासिक अगरबत्ती* आहे असा मला त्यावेळी भास झाला....!!!

आणि सारा आसमंत चक्कं सुगंधी झाला.....!!!

*Dr. Abhijit Sonawane*

Thursday, October 4, 2018

ज्यांना पाळी अपवित्र वाटते


ज्या पुरुषांना आणि स्त्रियांना पाळी अपवित्र वाटते, त्यांनी गर्भाशय नसणाऱ्या स्त्री शी विवाह करावा..
गर्भाशय नसणाऱ्या मुलीला सून म्हणून घरी आणावं..

काय ???
गर्भाशय नसेल
तर ती स्त्री कशी, असं म्हणताय ..??
वंशाची चिंता वाटते ??

हम्मम..

तिला गर्भाशय हवंच कारण त्यामुळेच ती सुरेख सुडौल असते, ज्यापायी तिला अनेक घाणेरड्या नजरा सहन कराव्या लागतात, (सॉरी तिला ताडायला मजा येते असं म्हणायचं होतं) तिचं दिसणं पारखून तिच्याशी लग्न केलं जातं, मग मुलं झाल्यावर ती सुटली की तिच्यावर जोक्स केले जातात, घरकी मुर्गी म्हणून गृहीत धरलं जातं.... ह्याला ती स्वतःच जबाबदार आहे.
खरं तर तिला स्वतः लाच हे कळायला हवं पाळी हेच सगळ्या दुखण्याचं मूळ कारण. काढून टाकायचं गर्भाशय....

ना रहेगी पाळी ना जन्म लेंगे विरोध करनेवाले...
बातच खतम.

का..?
बाईला स्वतःची काही इच्छा आणि मन आहे म्हणता ???
तिने स्वतःसाठी सुंदर दिसावं म्हणता, स्त्रीत्वाचा उत्सव मातृत्वाचा गौरव वगैरे ???

असं कसं ...?
दोन्ही बाजूंनी कसं बोलताय ??
एकच गोष्ट एकाचवेळी पवित्र आणि अपवित्र, महत्वाची बिनमहत्वाची कशी असू शकते ???

नक्की ठरवा बरं, एक काहीतरी...

कट्टर देवभक्त जन्मले कारण त्यांच्या आईला पाळी यायची, पाळी यायची म्ह्णून तिच्याशी त्यांच्या बाबांनी लग्न केलं, आणि म्हणून ते जन्म घेऊ शकले म्हणून पाळी पवित्र आहे म्हणायचं ..
की,
जन्म झाल्यावर, शिक्षण घेतल्यावर इतर महत्वाची अनेक कामं, विषय, मुद्दे असताना हेच देवभक्त पाळीविषयी अपप्रचार करतात, पाळी आलेल्या स्त्रीला त्रास देतात, हीन वागवतात.. म्हणजेच इथे पाळी अपवित्र आहे असं समजायचं का ?? ज्यामुळं अशी निर्बुद्ध माणसं जन्माला येतात ??

पाळीचा आणि त्यातून येणाऱ्या बाळाच्या बुद्धीचं काय लॉजिक म्हणता ???

मग पाळी येणाऱ्या बाईशी लग्न करून दर महिन्याला घर अपवित्र करण्यात काय लॉजिक आहे ??

"शेवटी काय आम्ही सोय बघणार, बुद्धी वापरणार नाही, देव कोपला तर ???

जगातल्या प्रगत देशात, बाया चार दिवस वेगळ्या बसतात, म्हणून देव त्यांना पावतो आणि म्हणून ते इतके प्रगत आहेत, हे माहिती आहे का तुम्हाला ??

मंदिरात प्रवेश मिळवून काय होणार आहे ?? आधी घरातल्यांच्या मनात आणि त्याही पेक्षा स्वतःच्या मनातली पाळी बद्दलची असहजता आणि मिथके काढून टाकायला हवियेत...

आता स्वतःचं उदाहरण देते,
मी नववी दहावीत असताना, गौरी गणपतीच्या दिवसात माझी पाळी आली, घरी सांगितलं तर मला घरीच बसावं लागेल म्हणून काही सांगितलं नाही, सगळीकडे छान बागडून आले,आरत्या केल्या, प्रसादाचं जेवले, काहीही झालं नाही.
नंतर कळलं, पाळी असताना आरती ऐकली आणि दर्शन घेतलं की आपण बहिरे आणि आंधळे होऊ, मला ऐकू येतं नीट आणि दिसतंही.

राहिला प्रश्न त्या दिवसातल्या आरामाचा तर ज्यांना तो मिळतो त्यांनी अवश्य करावा, (तेंव्हा धान्य निवडणं, भांडी घासणं लादून घेऊ नका) ज्यांना ऑफिस असतं त्यांना ही चैन हो चैनच, कितीही हाडं तुटली कमरेत दुखलं तरी कामात सूट नसते, आणि बरेचदा ती परवडत नाही, ऑफिस मध्ये काम लागतं, पवित्रता आणि देवाचा कोप हे सगळं घरी असतं.

थोडक्यात काय सोय महत्वाची असतेच पण त्यासोबतच जर माणुसकी ठेवली आणि बुद्धी वापरली तर सगळ्यांनाच जगणं सुसह्य होईल.

आणि पाळी पवित्र किंवा अपवित्र नसतेच ती फक्त नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्याचा आपण उगाच बाऊ करून ठेवला आहे.

 देवदर्शनाला जाताना, बायको मुलीच्या पाळीच्या तारखा पाहून ट्रिप ठरवा, अपवित्र म्हणून नव्हे तर तिचा कम्फर्ट महत्वाचा म्हणून.

हं, झालं माझं भाषण,
आता दसरा दिवाळीत पाळी येऊ नये म्हणून बायकांनी गोळ्या घ्या, आणि घरातल्या बाईची पाळी आली तर आपल्या सणांचा फियास्को नको म्हणून घरच्यांनी आणि नवऱ्याने तिला मूक संमती द्या, सण एकदाच येतो, पाळी दर महिन्याला येते, जास्तीत जास्त काय होईल, तिला पुढे जाऊन गर्भाशयाचा त्रास, ऑपरेशन वगैरे होईल, त्यात काय होऊ दे खर्च.....
आणि जर मेलिबिलीच समजा तर मग काय, मज्जाच, दुसरी आणू....
(अशाच अर्थाचे जोक enjoy करणार्यांनी इथे हळहळू नये, मन मे लड्डू फूटा"चा आनंद घ्यावा)

#ललितासमित(Lalita kamatakar bhoyer)