Thursday, October 4, 2018

ज्यांना पाळी अपवित्र वाटते


ज्या पुरुषांना आणि स्त्रियांना पाळी अपवित्र वाटते, त्यांनी गर्भाशय नसणाऱ्या स्त्री शी विवाह करावा..
गर्भाशय नसणाऱ्या मुलीला सून म्हणून घरी आणावं..

काय ???
गर्भाशय नसेल
तर ती स्त्री कशी, असं म्हणताय ..??
वंशाची चिंता वाटते ??

हम्मम..

तिला गर्भाशय हवंच कारण त्यामुळेच ती सुरेख सुडौल असते, ज्यापायी तिला अनेक घाणेरड्या नजरा सहन कराव्या लागतात, (सॉरी तिला ताडायला मजा येते असं म्हणायचं होतं) तिचं दिसणं पारखून तिच्याशी लग्न केलं जातं, मग मुलं झाल्यावर ती सुटली की तिच्यावर जोक्स केले जातात, घरकी मुर्गी म्हणून गृहीत धरलं जातं.... ह्याला ती स्वतःच जबाबदार आहे.
खरं तर तिला स्वतः लाच हे कळायला हवं पाळी हेच सगळ्या दुखण्याचं मूळ कारण. काढून टाकायचं गर्भाशय....

ना रहेगी पाळी ना जन्म लेंगे विरोध करनेवाले...
बातच खतम.

का..?
बाईला स्वतःची काही इच्छा आणि मन आहे म्हणता ???
तिने स्वतःसाठी सुंदर दिसावं म्हणता, स्त्रीत्वाचा उत्सव मातृत्वाचा गौरव वगैरे ???

असं कसं ...?
दोन्ही बाजूंनी कसं बोलताय ??
एकच गोष्ट एकाचवेळी पवित्र आणि अपवित्र, महत्वाची बिनमहत्वाची कशी असू शकते ???

नक्की ठरवा बरं, एक काहीतरी...

कट्टर देवभक्त जन्मले कारण त्यांच्या आईला पाळी यायची, पाळी यायची म्ह्णून तिच्याशी त्यांच्या बाबांनी लग्न केलं, आणि म्हणून ते जन्म घेऊ शकले म्हणून पाळी पवित्र आहे म्हणायचं ..
की,
जन्म झाल्यावर, शिक्षण घेतल्यावर इतर महत्वाची अनेक कामं, विषय, मुद्दे असताना हेच देवभक्त पाळीविषयी अपप्रचार करतात, पाळी आलेल्या स्त्रीला त्रास देतात, हीन वागवतात.. म्हणजेच इथे पाळी अपवित्र आहे असं समजायचं का ?? ज्यामुळं अशी निर्बुद्ध माणसं जन्माला येतात ??

पाळीचा आणि त्यातून येणाऱ्या बाळाच्या बुद्धीचं काय लॉजिक म्हणता ???

मग पाळी येणाऱ्या बाईशी लग्न करून दर महिन्याला घर अपवित्र करण्यात काय लॉजिक आहे ??

"शेवटी काय आम्ही सोय बघणार, बुद्धी वापरणार नाही, देव कोपला तर ???

जगातल्या प्रगत देशात, बाया चार दिवस वेगळ्या बसतात, म्हणून देव त्यांना पावतो आणि म्हणून ते इतके प्रगत आहेत, हे माहिती आहे का तुम्हाला ??

मंदिरात प्रवेश मिळवून काय होणार आहे ?? आधी घरातल्यांच्या मनात आणि त्याही पेक्षा स्वतःच्या मनातली पाळी बद्दलची असहजता आणि मिथके काढून टाकायला हवियेत...

आता स्वतःचं उदाहरण देते,
मी नववी दहावीत असताना, गौरी गणपतीच्या दिवसात माझी पाळी आली, घरी सांगितलं तर मला घरीच बसावं लागेल म्हणून काही सांगितलं नाही, सगळीकडे छान बागडून आले,आरत्या केल्या, प्रसादाचं जेवले, काहीही झालं नाही.
नंतर कळलं, पाळी असताना आरती ऐकली आणि दर्शन घेतलं की आपण बहिरे आणि आंधळे होऊ, मला ऐकू येतं नीट आणि दिसतंही.

राहिला प्रश्न त्या दिवसातल्या आरामाचा तर ज्यांना तो मिळतो त्यांनी अवश्य करावा, (तेंव्हा धान्य निवडणं, भांडी घासणं लादून घेऊ नका) ज्यांना ऑफिस असतं त्यांना ही चैन हो चैनच, कितीही हाडं तुटली कमरेत दुखलं तरी कामात सूट नसते, आणि बरेचदा ती परवडत नाही, ऑफिस मध्ये काम लागतं, पवित्रता आणि देवाचा कोप हे सगळं घरी असतं.

थोडक्यात काय सोय महत्वाची असतेच पण त्यासोबतच जर माणुसकी ठेवली आणि बुद्धी वापरली तर सगळ्यांनाच जगणं सुसह्य होईल.

आणि पाळी पवित्र किंवा अपवित्र नसतेच ती फक्त नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्याचा आपण उगाच बाऊ करून ठेवला आहे.

 देवदर्शनाला जाताना, बायको मुलीच्या पाळीच्या तारखा पाहून ट्रिप ठरवा, अपवित्र म्हणून नव्हे तर तिचा कम्फर्ट महत्वाचा म्हणून.

हं, झालं माझं भाषण,
आता दसरा दिवाळीत पाळी येऊ नये म्हणून बायकांनी गोळ्या घ्या, आणि घरातल्या बाईची पाळी आली तर आपल्या सणांचा फियास्को नको म्हणून घरच्यांनी आणि नवऱ्याने तिला मूक संमती द्या, सण एकदाच येतो, पाळी दर महिन्याला येते, जास्तीत जास्त काय होईल, तिला पुढे जाऊन गर्भाशयाचा त्रास, ऑपरेशन वगैरे होईल, त्यात काय होऊ दे खर्च.....
आणि जर मेलिबिलीच समजा तर मग काय, मज्जाच, दुसरी आणू....
(अशाच अर्थाचे जोक enjoy करणार्यांनी इथे हळहळू नये, मन मे लड्डू फूटा"चा आनंद घ्यावा)

#ललितासमित(Lalita kamatakar bhoyer)

No comments:

Post a Comment