Monday, November 20, 2017

चुकीचा निर्णय

जेमतेम नववीला होते. वयानं लहान असले तरी शरीरानं मात्र भरले होते. आई आता शाळेला जाताना छाती जास्त फुगून दिसायला नको , ती चालताना हलू नये म्हणून सुती कपड्याने बांधून देत होती. वरून सक्त ताकीद असायची "हळू चालायचे , उड्या मारायच्या नाहीत " वगैरे वगैरे. आता मीही ऐकून असलेली मासिक पाळी तीन दिवस बाजूला बसून अनूभवत होते.

गावठाण्यावर आमची शाळा होती. तिथल्याच एका पानपट्टीवर कपाळाला रूमाल गुंडाळलेला , तोंडात एखादी पुडी किंवा खर्रा चघळत उभा असलेला तो परंतु खूप देखना आणि डेरींगबाज . तो मला नरसिंह पिच्चर मधला सनी देओल वाटायचा. तो सतत माझ्या मागेपुढे फिरायचा. सर्व सांगत होते, तो टवाळ आहे . दारू पितो. पण मी कुणाच्याच सांगण्यावर लक्ष दिले नाही.

त्यानं माझी नजर हेरली आणि हिमतीने नववीच्या वर्षाअखेर मला एक चिठ्ठी दिली. लिहलं होतं - "आय लव यू" आणि खाली नाव होतं.

त्यानं मला चिठ्ठी दिलेली काय कसं माहित चुलत भावाला कळलं. त्याला खूप मारलं. माझ्यावरही विशेष पाळत बसली.

याचा उलट परिणाम झाला. चोरून भेटण्यात मजा येऊ लागली. माझ्या मनात त्याच्याबद्दल प्रेम वाढत गेलं आणि त्यानंही माझ्या चूलत भावांच्या खून्नशीवर माझ्याशी लग्न करायचं ठरवलं. अर्थातच मी त्याला पुरेपूर साथ दिली.
पळून जाऊन लग्न केलं.

लग्न झालं इथूनच आयुष्याची राखरांगोळी झाली. खेळाच्या वयात मुलं झाली. मुलांच्या वयाबरोबर तसेच घरखर्चाबरोबर त्याचं दारूचं व्यसन वाढत गेलं ते एवढं वाढलं की त्याला कळायचे सुध्दा नाही तो घरी झोपलाय की रस्त्यावर . घरचा सर्व प्रपंच मलाच बघाव लागायचा . ब्लाऊज शिवून मिळालेल्या शंभर एक रूपयातलेही पैसे हा भांडून घेवून जायचा.

एक दिवस हद्दपार केली. त्याच्या दोन मित्रांना घेवून तो घरी आला. एरवी माझ्याकडे कुणी  बघीतलेलेही त्याला चालत नसे. आज मात्र यानं त्याच्या दोन मित्रांना व मला एका खोलीत बंद करून बाहेरून कडी लावून घेतली होती ती सकाळीच दारूची नशा उतरताच उघडली. जो नाही व्हायचा तो अतिप्रसंग माझ्यावर होऊन गेला होता. त्या दोघांनी लाल - हिरव्या नोटा त्याच्या हातात टेकवल्या.
त्यानं माझ्या उघड्या पडलेल्या अंगावर शेवटची नजर टाकली ऊंबरठ्यावरूनच पाठमोरा फिरला, दिसला तो आतल्या घरातील नाटीला लटकलेलाच. 

त्या रात्री त्या दोन मित्रांचं त्यानं टाकलेलं ओझं मी आजही अधूनमधून माझ्या उरावर पेलत असते. तेही त्याच्या भिंतीवरोल फ्रेम केलेल्या फोटोसमोर , नग्न उतानी पडून.
पश्चात्ताप करत असते, लहान वयात वाहवत जावून घेतलेल्या चूकीच्या निर्णयाचा....
आता कुठलंच स्वप्न दिसत नाही, दिसतात ते फक्त मुलांच्या पोटाला पडलेले खोल खड्डे ......
✍सुधीर त्र्यें. पाटील
#सुधीरपाटील
( NGO चालवत असणाऱ्या माझ्या मैत्रीणीने मला सांगितलेली ही एका महिलेचे दुःख. मी हे लिहावं अशी त्या महिलेनेच विनंती केली. )
( पोस्ट चोरण्याचा प्रयत्न करू नये. लेखनाचे सर्व अधिकार राखून ठेवले आहेत.@ )

No comments:

Post a Comment