फेसबुक, व्हाट्स अॅप आपल्याला मोफत सेवा कशी पुरवत असेल ? एक पैसाही आज पर्यंत आपण फेसबुकला दिला नाही. व्हाट्स अॅप मध्ये नेमकं काय आहे की फेसबुकने एकोणीस बिलियन डॉलरला ते विकत घ्यावं ?
एका फेसबुक युजर च्या मागे फेसबुक वर्षाला सातशे ते आठशे रूपये कमावतं, हे माहित आहे का ? संपुर्ण जगभरात किती फेसबुक युजर असतील ?
एक हायवे आहे, रोज लाखो लोक ये जा करत असतात. रस्त्याच्या कडेला गाडीच्या जाहिरातीचं मोठे होर्डिंग आहे. जाहिरात बघून किती लोक ती गाडी घेण्याचे स्वप्न बघतील ? किती लोक ती गाडी घेण्याचा विचार करतील ? लाखो लोकामधले किती लोक ती गाडी खरेदी करतील ? एक टक्का ? दोन टक्के ? मग या दोन टक्के लोकांसाठी कंपनीला लाखो लोक बघू शकतील अशी प्रचंड जाहिरात करावी लागतेय ? पण जर अशी जादू झाली की ज्याला ती गाडी घ्यायची आहे त्यालाच फक्त ती जाहिरात दिसावी. इतर लोकांना त्यांच्या आवडीच्या वस्तूच्याच वेगवेगळ्या जाहिराती दिसाव्यात . कंपन्यांचं जाहिरातीवरचं किती काम वाचेल ना ? त्या वस्तूत स्वारस्य नसलेल्या व्यक्तिवर जाहिरातीचा करावयाचा वायफळ खर्चही वाचेल ना ? पण कंपन्यांनी असा जादूगर कुठून आणायचा ?
कंपन्यांना तो जादूगार सापडलाय ! फेसबुक. त्याचा साथीदार आहे व्हाटस अॅप . आपली एवढी माहिती फेसबुकला आहे, जेवढी आपल्यालाही नाही. काम धंदा, वय, लिंग, आवड निवड, राहण्याचे ठीकाण. कुठे जन्मला, कुठल्या शाळेत गेला, काय शिकला, कुठे गेला ? काय खातो, काय पितो, विक पॉईंट कुठला ? स्ट्रॉंग बाजू कुठली, स्वभाव, विचार, फिरायला जाण्याची ठीकाणं , कधी कुठे फिरायला गेला होता, मित्र कोण, कसे आहेत ? येवढी माहिती फेसबुकला आपणच तर दिलेली असते, नंतर आपण त्यातली काही माहिती विसरूनही गेलेलो असतो, काही माहिती आपण डिलीटही केलेली असते, फेसबुकवर मात्र प्रत्येकाचं संपुर्ण रेकॉर्ड सेव्ह असतं. व्हाटस अॅप त्याला आपल्या मित्रांची सगळी माहिती पुरवतं. येवढा मोठा डाटा बेस सद्ध्यातरी अणखी कुणाकडे नाही.
अॅमेझॉनवर तुम्ही एखाद्या वस्तूचा शोध जरी घेतला तरी काही मिनिटातच ती वस्तू तुम्हाला तुमच्या फेसबुक टाईम लाईनवर सतत दिसू लागते, सतत तुमचा पिच्छा पुरवते. अॅमेझॉन फेसबुकला त्या व्यक्तिलाच फक्त ती जाहिरात दाखवण्याचे पैसे देत असतं, फेसबुक आपलं काम चोख करत राहतं. फेसबुक अशा प्रकारे अनेक कंपन्यांकडून पैसे कमावत असतं. फेसबुक एका युजर मागे वर्षाला आठशे रूपये कमावतं ,आपण मात्र फेसबुकचा वेगळाच वापर करतो नाही का ?
जात, धर्म, राजकारण, गट, तट, पंथ, सगळे एकमेकांचे कट्टर दुश्मन झालेत. रोज एकमेकाच्या उरावर बसण्यासाठी आपण फेसबुकचा वापर करतो. आपआपले स्कोअर सेटल करत राहतो. फेसबुकवरून क्रांतीच्या बाता मारत राहतो. सरकार उलथवून लावण्याची भाषा करतो. सकारात्मक, नकारात्मक, वापर, गैरवापर करत राहतो. आपल्यासाठी ते फ्री आहे ना !
कॉन्ट्रॅक्टस , मिडिया फाईल्स, आयडेन्टीटी, लोकेशन, सगळ्यात घूसण्याची आपणच फेसबुक ला परवानगी दिलेली असते. तुम्ही कुठे आहात ? तुमच्या मोबाईल मध्ये काय काय आहे ? सगळं फेसबुकला दिसंत असतं. तुमचं अकाउंट, मग ते फेक का असेना, तुमची खरी ओळख फेसबुक पासून दडून राहू शकत नाही. तीन गोष्टी तुमचे बॅंक अकाउंट रिकामे करू शकतात. तुम्ही बॅंकेसाठी रजिस्टर केलेला मोबाईल नंबर, तुमचे पुर्ण नाव, तुमची जन्मतारीख, महिना, वर्ष. हॅकर्स साठी पुढचं सगळं सोपं असतं.
फेसबुक सुरक्षित आहे, पण तुमची प्रायव्हसी सुरक्षित नाही. फेसबुकला किती, आणि कोणती माहिती पुरवायची, याचा विचार करण्याची खरंच आज गरज आहे. नोकरीसाठी मुलाखतीस जाणाऱ्या उमेदवाराच्या बायोडाटा पेक्षा, त्याचा फेसबुकवरचा डाटा महत्वाचा वाटतो नोकरी देणारांना. त्यावरून त्याची नोकरी ठरते. म्हणून चांगल्यासाठीच फेसबुकचा वापर व्हायला हवा. नाहीतर प्रत्यक्षात तुम्ही कितीही सज्जन असा, फेसबुकवरची तुमची सोशल इमेजच जगात तुम्हाला ओळख निर्माण करून देणारी ठरणार आहे आता …..
No comments:
Post a Comment